धामणगाव बढे (सादिक बिस्मिल्लाह शेख/हॅलो बुलढाणा) अशोकाचे झाड हे एक सुंदर, पवित्र आणि औषधी गुणधर्म व भरपूर ऑक्सिजन देणारे सदाहरित वृक्ष आहे. अशा तब्बल १०० अशोक झाडांच्या रोपांची
धामणगाव बढे येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात लागवड करून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे. मुसाभाई ठेकेदार यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मजूर गँगच्या सहकार्याने हा स्तुत्य वृक्षारोपण उपक्रम आज उत्साहात पार पडला.
कब्रस्तान परिसरात हिरवाई वाढावी, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि भावी पिढीला स्वच्छ व सुंदर वातावरण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, मुसा भाई ठेकेदार यांनी अशोकाच्या रोपांची लागवड केली. यावेळी मजीद बागवान, मुसा खा बुडन खा, अल्ताफ खा, अलीम खा, नासिर बागवान, बबलू शेख, अल्ताफ शेख, अफसर खा, सलमान शेख यांच्यासह मजूर वर्गाने परिश्रम घेतले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, असा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे धामणगाव बढे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













Total Users : 3295094