साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा /दर्शन गवई)
सिंदखेडराजा तालुक्यात १२३ राशन दचकानदार असून त्यापैकी सिंदखेडराजा येथील गोडाऊन मधून ७७ दुकानदारांना आनंदाचा शिधा मिळाला आहे. त्याचे वाटपही झाले आहे.परंतू साखरखेर्डा येथील गोडाऊन मध्ये आनंदाचा शिधा आलाच नसल्याने ४६ राशन दुकानदारांना मिळाला नसल्याची धक्का दायक माहिती मिळाली आहे.
गणपती आणि गौरी गणपती सणाला आनंदाचा शिधा मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यात गहू ,साखर,तेल, रवा,चना डाळ,मैदा अशा सात वस्तूचा समावेश होता. परंतू गौरी गणपती सण होऊन आज १५ दिवस झाले तरी शासनाने साखरखेर्डा भागातील ४१ गावातील ४६ राशन दुकानदारांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला नाही.आज येईल,उद्या येईल या आशेने ग्राहक प्रतिक्षा करीत आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील ७७ राशन दुकानदारांना सिंदखेडराजा येथील गोडाऊन मधून आनंदाचा शिधा गौरी गणपती सणाला वितरण करण्यात आला. नेमका साखरखेर्डा भागातील नागरिकांना का वितरण करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. गौरी गणपती सण झाला,पितृपक्ष संपत आला. आता नवरात्र उत्सव सुरु होत आहे.
किमान नवरात्र उत्सवात आनंदाचा शिधा मिळावा अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.
▪️शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) महेंद्र पाटील म्हणाले..
आनंदाचा शिधा का मिळाला नाही या बाबत तहसीलदार अजित दिवटे यांच्याशी संपर्क साधून तो त्वरीत उपलब्ध करून द्यावा यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.
▪️सिंदखेडराजाचे पुरवठा निरीक्षक, सिंदखेडराजा संदीप बंगाळे म्हणाले..
शासनाकडून लवकरच आनंदाचा शिधा उपलब्ध होणार असून नवरात्र उत्सव सुरु होण्यापूर्वी वितरण केले जाणार आहे.
▪️सप्टेंबर महिन्यात झाले केवळ ज्वारीचे वाटप !
साखरखेर्डा येथील गोडाऊन मधून ४६ राशन दुकानदारांना केवळ ज्वारी उपलब्ध झाल्याने ग्राहकांना किड लागलेली , भोंग लागलेली पिठाळ ज्वारी वाटप करण्यात आल्याने असंख्य ग्राहकांनी तंक्रार केली आहे . परंतू ग्राहकांच्या तक्रारींची एकाही राजकीय नेत्यांनी दखल घेतली नाही . अखेर लाडक्या बहिणीच्या नशिबात ज्वारी आल्याने अनेक महिलांनी आपला रोष व्यक्त केला आहे . गहू , तांदूळ ह्या दोनच वस्तू राशन दुकानातून वाटप होत असताना या महिन्यात ज्वारीचे वाटप करुन शासनाने नेमके काय साध्य केले आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.