बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय अखेर शासनाने घेतला आहे. बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नाव देण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून या निर्णयामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१०० विद्यार्थी क्षमतेचे हे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय आता नव्या ओळखीने कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा असल्याने या नामकरणाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणूनच नव्हे, तर स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा आणि संस्कारक्षम नेतृत्वामुळेच शिवराय घडले. त्यामुळे या महाविद्यालयाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्याला खरी आदरांजली मानली जात आहे.
या निर्णयामुळे केवळ नाव बदलले नसून, विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिजाऊंच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा हा निर्णय ठरणार असून, आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.










