चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील अंढेरा फाटा-जालना रोडवर आज दुपारी सुमारे 12:30 वाजता झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्न समारंभासाठी मित्रांसोबत बुलेटने अंबड (जि. जालना) येथे निघालेल्या तरुणांचा प्रवास काळाच्या फेऱ्यात संपला.
या अपघातात ओम जमदार (वय 20, रा. चिखली) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले जय जमदार आणि अभी भवर (दोघेही वय 20, रा. चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अंढेरा फाटा परिसरात बुलेटचा वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली आणि भीषण अपघात घडला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना रुग्णालयात हलवले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. जखमींवर चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस करत असून, लग्नाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.










