बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे महत्व देशपातळीवर अधोरेखित आहे. स्वराज्य स्थापनेचे बाळकडूच छत्रपती शिवरायांना या मातीतूनच मिळाले आहे. जिजाऊंचा जिल्हा असलातरी जिजाऊंच्या नावाचा गौरव सरकारी पातळीवर व्यापक प्रमाणात होत नसल्याची खंत व्यक्त करुन वंचितचे शहर अध्यक्ष मिलींद वानखडे यांनी जिल्हा स्त्री रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणाच्या प्रवेशद्वारास राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण जगभर ख्याती असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म हा बुलडाणा जिल्हयातील सिंदखेड राजा येथे झाला असल्याने बुलडाणा जिल्हयाची ओळख राजमाता माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा अशी जगभर आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक सरकारी वास्तू अथवा प्रवेशद्वारांना जिजाऊंचे नाव नसल्याचे शल्य जिल्हावासियांना आहे. तरी जिल्हा स्त्री रूग्णालय, बुलडाणा तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारास राजमाता जिजाऊ यांचे नांव देण्यात यावे, अशी मागणी वंचितचे शहरअध्यक्ष मिलींद वानखडे यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन देते वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहितराजे दामोदर, तालुका अध्यक्ष मनोज खरात, शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, अभिषेक सपकाळ ई. उपस्थित होते.