बुलडाणा (हॅलो बुलढाणा) गोमाल या आदिवासी बहुल गावात अशुध्द पाण्यामुळेच 106 रुग्ण जुलाबाने त्रस्त असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे. येथे अतिसाराने तिघांचा बळी गेलाय.मीडियाने येथील वास्तव मांडल्यानंतर उशिरा का होईना जिल्हा यंत्रणाने तिथे जाऊन तपास केला आणि रुग्णांना आरोग्य संदर्भातील सूचना केल्या आहेत.आधीच सोयी सुविधा असत्या तर तिघांचा बळी गेला नसता,यंत्रणेला उशिरा शहाणपण सुचल्याच्या रोषात्मक प्रतिक्रिया उमटताहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल येथे उपकेंद्र, भिंगारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास 9 सप्टेंबर रोजी आ. संजय कुटे यांचे सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तसेच जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी मौजे गोमाल येथे भेट देऊन सद्यस्थितीची माहिती घेतली. मौजे गोमाल येथे 7 सप्टेंबर पासून ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी, हगवन अशी लक्षणे असलेले 106 रुग्ण आढळले असून त्यामध्ये 26 रुग्णांना जुलाबचा सौम्य त्रास असल्याचे दिसून आले. गावातील काही नागरिकांनी अशुध्द पाणी पिल्यामूळे सदर जुलाबाचा त्रास झाल्याचे पुढे आले आहे. मौजे गोमाल मध्ये विविक्षीत कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व इतर आरोग्य कर्मचारी 24 तास उपस्थित असुन गावामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहे. या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून दैनंदिन क्लोरीनेशन करण्यात येत आहे. गावामध्ये घरोघरी मेडीक्लोर वाटप करण्यात आले असून नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून पिण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात आली असून भरती करण्यात आलेल्या रुग्णांना उपचार पश्चात प्रकृती ठिक असल्यामूळे सुटी देण्यात आली आहे.मौजे गोमाल येथे 3 रुग्णांचा मृत्यु झाला असून नातेवाईकांनी मृत्यु झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यास नकार दिल्यामूळे मृत्युचे कारण निश्चितपणे सागंता येणार नाही. याबाबत इतर वृत्तपत्रामध्ये 200 पेक्षा जास्त अतिसाराचे लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले. अशी आकडेवारी दाखवण्यात आलेली असून सदर आकडे वस्तुस्थिती दर्शक नाही. सदर आजार हा कॉलरा, पटकी नसून नागरिकांनी भयभित होऊ नये.जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व निर्जंतुकिकरण करुन पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर तथा तालुका स्तरावर साथरोग प्रतिबंधात्मक, जलशुध्दीकरण, मान्सूनपुर्व तयारी बाबत सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय यांना याबाबतच्या करावयाच्या उपाययोजना बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लेखी स्वरुपात देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.











