spot_img
spot_img

BREAKING! प्रकृती खालावली; गोंधनखेडच्या शेतात झाडाखाली घेतले सलाईन, स्प्रिंकलरला अडकवली सलाईनची बाटली; अवघ्या १५ मिनिटांत आळंदच्या सभेत पुन्हा हातात माईक! रविकांत तुपकरांची संघर्षयात्रा सुरूच; शरीर थकलं, पण शेतकऱ्यांसाठी लढण्याची जिद्द कायम!

देऊळगावराजा (हॅलो बुलढाणा) सलग तेरा दिवसांचा प्रवास, दररोज गावोगावी पंधरा ते वीस सभा, रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद, अपुरी झोप, घशाचा त्रास आणि प्रचंड दगदग… याचा परिणाम आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर जाणवू लागला आहे. मात्र, प्रकृती खालावली असतानाही शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या संघर्षातून माघार घेण्यास तुपकर तयार नाहीत. आज, २६ नोव्हेंबर रोजी दुष्काळ संघर्ष यात्रेच्या तेराव्या दिवशी देऊळगावराजा तालुक्यातील गोंधनखेड येथे दुपारच्या जेवणासाठी यात्रा शेतकरी गजानन जायभाये यांच्या शेतात थांबली होती. यावेळी तुपकरांना अशक्तपणा जाणवू लागल्याने देऊळगावमही येथील डॉ.राहुल गायकवाड यांना बोलावण्यात आले. विशेष म्हणजे, शेतातील झाडाखालीच तुपकरांवर उपचार करण्यात आले. सलाईनची बाटली अडकविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने शेतातील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या स्प्रिंकलरला सलाईनची बाटली अडकविण्यात आली. सुमारे तासभर सलाईन घेतल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत तुपकर पुन्हा आळंद येथील सभेसाठी हजर झाले. शेतकऱ्यांच्या बांधावर झाडाखाली सलाईन घेऊन पुन्हा शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसाठी सभेत उभे राहिलेल्या तुपकरांची ही धडपड संघर्षयात्रेची भावनिक बाजू अधोरेखित करणारी ठरली आहे.

 

१४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेचा आज तेरावा दिवस आहे. सकाळी लवकर सुरू होणारा दौरा अनेकदा रात्री अकरा वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर भोजन, मुक्कामाच्या ठिकाणी भेटायला आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न, असा तुपकरांचा दिनक्रम सुरू आहे. दररोजच्या सभा आणि सातत्याने बोलण्यामुळे त्यांचा आवाजही बसला आहे. काल सावखेड तेजन येथील सभेत बोलताना त्यांनी आपल्या घशात आणि तोंडात जखम असून दररोज दोन तासांपेक्षा अधिक झोप मिळत नसल्याचे सांगितले होते. अशातच आज गोंधनखेड येथे दुपारच्या भोजनासाठी थांबले असताना त्यांना सलाईन घेण्याची वेळ आली. शेतातील झाडाची सावली आणि सलाईनची बाटली अडकविण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार, अशा परिस्थितीत डॉ. राहुल गायकवाड यांनी त्यांच्यावर उपचार केले.

विशेष म्हणजे, सलाईन संपल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत तुपकर पुढील नियोजित सभेसाठी आळंद येथे हजर झाले. पुन्हा हातात माईक घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीकविमा, शेतमालाला योग्य भाव यांसह विविध मागण्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चासंदर्भातही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

एकीकडे गावोगावी दुष्काळ संघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे, तर दुसरीकडे सातत्याच्या दगदगीमुळे तुपकरांची प्रकृती खालावत आहे. ना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम, ना मोठा लवाजमा; गावात उपलब्ध होईल त्या व्यवस्थेत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी प्रवास सुरू होत आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची गरज असतानाही त्यांनी आपला नियोजित दौरा थांबवलेला नाही. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या घरातील चूल पेटावी आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, या मागण्यांसाठी तुपकरांनी उभारलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ४ डिसेंबरच्या एल्गार महामोर्चाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट उभी करण्यासाठी तुपकरांची धडपड सुरूच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गेल्या तेरा दिवसांपासून तुपकर त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत, त्याच शेतकऱ्याच्या बांधावर आज त्यांना सलाईन घेण्याची वेळ आली. शरीर थकत आहे, आवाज साथ देत नाही; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची त्यांची जिद्द कायम आहे..

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!