मलकापूर (हॅलो बुलढाणा) आतल्या खोलीतून सासूच्या ओरडण्याचा आवाज आला. सून धावत गेली, तर तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला थेट तिच्या अंगावर धावून आली. झटापटीत सासू-सुनेने तिचा स्कार्फ काढला आणि चेहरा पाहताच दोघींना धक्का बसला. ती महिला घरामागच्या गल्लीतील ‘कोमल’ असल्याचे सोनाली अजय तिवारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
मलकापूरच्या लखानी चौकात २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सोनाली तिवारी आणि त्यांच्या सासू उर्मिला सुरेश तिवारी घरात होत्या. त्यावेळी स्कार्फ बांधलेली महिला घरात शिरली. पलंगावर बसलेल्या उर्मिला यांच्याशी झटापट करून तिने त्यांच्या हातातील पाच ग्रॅमची, अंदाजे ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावल्याचा आरोप आहे. धक्काबुक्कीत उर्मिला यांच्या उजव्या हाताच्या बोटातून रक्त आले.
सासूचा आवाज ऐकून सोनाली खोलीत पोहोचल्या. त्यांनाही नखांनी ओरखडे काढून छातीवर काठीने मारल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले. दोघींनी मिळून महिलेला पकडले. मात्र, स्कार्फ काढताच ती हात झटकून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोनाली यांनी शेजारीण मीनाक्षी वर्मा यांच्यासह पोलीस ठाणे गाठून तोंडी फिर्याद दिली. त्यावरून मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३०९(४) आणि ३३१(२) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मोहन झेडगे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.













Total Users : 3826118