spot_img
spot_img

HELLO BULDANA IMPACT हॅलो बुलढाणाची बातमी… अन् सुनगावच्या प्लॉटिंगला तहसीलदारांची थेट नोटीस! रेतीची रॉयल्टी कुठं? अहवालात १०० ब्रास ‘रोळी’ची नोंद. ७ डिसेंबरला वैध रॉयल्टीसह हजर राहण्याचे निर्देश!

सुनगाव (हॅलो बुलढाणा) ग्रामीण भागातील सुनगावच्या प्लॉटिंगमध्ये रस्ते तयार झाले, आता त्यासाठी टाकलेल्या रोळीची वैध रॉयल्टी तहसीलदारांनी मागितली आहे! उत्खननाचा मुद्दा ‘हॅलो बुलढाणा’ने दोन दिवसांपूर्वी मांडला होता. या प्रकरणात जळगाव जामोद तहसीलदार कार्यालयाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी जमीनमालक प्रसन्नकुमार अरुण संगई यांना नोटीस जारी केली आहे. ७ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता लेखी जबाब आणि वैध रॉयल्टीची कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे निर्देश त्यात दिले आहेत.

जामोद रोडलगत ग्रामीण सुनगाव भाग-२ मधील गट क्रमांक ४९६ आणि ४९७ या प्रस्तावित अकृषक जागेची १७ नोव्हेंबरला पाहणी झाली. तिथे अंदाजे १०० ब्रास रोळी टाकून ती रोलरने पसरवली आणि रस्ते तयार केले, अशी नोंद ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या १८ नोव्हेंबरच्या अहवालात असल्याचे नोटिशीत नमूद आहे.

रस्त्यांवर १०० ब्रास रोळी, मग उत्खनन किती?

याच परिसरात १७० ते १९० ब्रास मुरूम-मातीचे उत्खनन झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नोटिशीतील १०० ब्रासचा आकडा रस्त्यांसाठी टाकलेल्या रोळीचा आहे. प्रत्यक्ष उत्खनन किती झाले आणि रस्त्यांवर टाकलेली रोळी कुठून आणली, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अद्याप बाकी आहेत. नदीतील साहित्य विनापरवाना वापरल्याचाही आरोप आहे. स्वतंत्र फेरमोजणी आणि पंचनामा करून ग्राम महसूल अधिकारी चौरे व वाघ यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गैरहजर राहिल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

संगई गैरहजर राहिल्यास त्यांना या प्रकरणात काही म्हणणे मांडायचे नाही, असे गृहीत धरून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. सुनगाव भाग-२च्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तिची प्रत तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. आता ७ डिसेंबरला रॉयल्टीची कागदपत्रे सादर होणार का आणि उत्खननाची स्वतंत्र मोजणी होणार का, याकडे सुनगावचे लक्ष आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!