बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रात्री अकरापर्यंत सभा, त्यानंतर सहकाऱ्यांसोबत जेवण आणि मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा! रविकांत तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेचा अकरावा दिवस २४ नोव्हेंबरला किनगाव राजातील एल्गार सभेने गाजला. सभा आटोपल्यानंतर तुपकरांनी उमरदच्या नरसिंह मंदिरात मुक्काम केला. तिथेही कर्ज, पीकविमा आणि सरकारी कार्यालयांत रखडलेल्या कामांचा पाढा शेतकऱ्यांनी मांडला. ज्या अडचणींवर तातडीने तोडगा निघू शकतो, त्यासाठी तुपकरांनी मुक्कामाच्या ठिकाणाहूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावले.
१४ नोव्हेंबरला मलकापूरातून निघालेली यात्रा अकराव्या दिवशी सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका, दुसरबीड, राहेरी, ताडशिवणी, देवखेड, रुम्हणा, सोयंदेव, चांगेफळ, धानोरा, बुट्टा, वर्दडी, सोनोशी आणि जांभोरा या गावांतून किनगाव राजात पोहोचली. रात्रीच्या सभेला शेतकरी, शेतमजूर, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसा शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी, संध्याकाळी गावागावांत सभा आणि रात्री मुक्कामाच्या ठिकाणी वैयक्तिक अडचणींची सुनावणी, असा यात्रेचा दिनक्रम आहे. गावकरी भोजन आणि मुक्कामाची व्यवस्था करतात. जेवण झाल्यावर कुणी पीकविम्याचा प्रश्न घेऊन येतो, तर कुणी कर्जासाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांची व्यथा सांगतो. मध्यरात्रीपर्यंत या गाठीभेटी चालतात आणि सकाळी यात्रा पुन्हा पुढच्या गावाकडे निघते.
हेक्टरी एक लाखांची मदत, सरसकट कर्जमुक्ती, नव्याने पीककर्ज, हक्काचा पीकविमा आणि सिबिलच्या अटीतून दिलासा या यात्रेच्या प्रमुख मागण्या आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती, भूमिहीन आणि शेतमजुरांना आर्थिक मदत, तसेच सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा, यासाठीही आंदोलन सुरू आहे.
घाटाखालून घाटावर पोहोचलेल्या यात्रेचा पुढचा मोठा टप्पा ४ डिसेंबरचा बुलढाण्यातील एल्गार महामोर्चा आहे. मोर्चाची तारीख जवळ येताच गावागावांत तयारीला वेग आला आहे. किनगाव राजात रात्री उशिरापर्यंत दिसलेली गर्दी आता बुलढाण्याच्या रस्त्यावर किती मोठ्या संख्येने उतरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













Total Users : 3824972