spot_img
spot_img

जमीन खासगी… नोंद ‘सरकारी’? खोर ग्रामपंचायतीत दडलंय काय?

चिखली (हॅलो बुलढाणा) खासगी जागेवर शासनाची नोंद करून अनुदान मिळवले कसे? एका गटाचा सातबारा आणि दुसरीकडे बांधकाम, हा प्रकार घडला कसा? खोर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रारदार सौ. आरती प्रदीप हाके, रा. खोर, ता. चिखली यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गटविकास अधिकारी व तहसीलदारांकडे वारंवार लेखी पुरावे सादर करूनही कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

 

हाके यांच्या तक्रारीनुसार, खासगी गट क्रमांक ११४ मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ अशी चुकीची नोंद करून सभामंडपासाठी ४ लाख ८४ हजार रुपये अनुदान मिळवण्यात आले. १० जानेवारी २०१५ च्या खुलाशात ही नोंद ‘नकळत’ झाल्याचे ग्रामपंचायतीने म्हटल्याचा त्यांचा दावा आहे. मग अनुदान मंजुरीवेळी पडताळणी झाली होती का?

अंगणवाडीसाठी गट क्रमांक ११३ चा सातबारा वापरून ४ लाख ५१ हजार ९४८ रुपये निधी मिळवला; प्रत्यक्ष बांधकाम मात्र गट क्रमांक १०८ मधील गावनकाशावरील रस्त्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शाळेलगतच्या सिमेंट रस्त्यासाठी ३ लाख ८६ हजार ६३० रुपये, तर नालीसाठी ४ लाख ७० हजार ८३६ रुपये खर्च झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र गट क्रमांकाची माहिती तलाठ्यांकडून घ्यावी, असे ग्रामपंचायतीने लेखी उत्तर दिल्याचा हाके यांचा दावा आहे. काम करणाऱ्या यंत्रणेकडेच जागेचा तपशील का नाही?

तीन घरकुल लाभार्थ्यांच्या जागांची नमुना आठमध्ये नोंद करण्याचा आधार दप्तरी उपलब्ध नसल्याचाही त्यांचा आक्षेप आहे. गट क्रमांक १५३ मधील नकाशावरील रस्ता अर्ज करूनही खुला झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कागदपत्रांची पडताळणी, प्रत्यक्ष मोजणी आणि सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनासह कारवाई करावी, अशी हाके यांची मागणी आहे. या आरोपांबाबत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!