जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) साखर कारखान्यावर ट्रॅक्टर भाड्याने लावून देण्याचे आमिष, डिपॉझिट आणि दरमहा पैसे देण्याचे आश्वासन… मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! ट्रॅक्टर भाडे व्यवहारातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता या व्यवहारातील पैशांचा हिशेब आणि आश्वासनांची पूर्तता यावरून संबंधित व्यक्तीला जाब विचारला जात आहे.
बार्शी, जि. सोलापूर येथील एका व्यक्तीविरुद्ध पीडित शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. काहींना पैसे मिळाले; मात्र अनेकांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे पुढे झाले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
२४ नोव्हेंबर रोजी सुमारे २० ते २२ शेतकरी नोटरी केलेली कागदपत्रे व इतर पुरावे घेऊन तक्रार देण्यासाठी पुढे आले. बाधित शेतकऱ्यांची संख्या ५० ते १०० पर्यंत असू शकते, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली असून, या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आज-उद्यामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष गजानन वाघ आणि पीडित शेतकरी उपस्थित होते.
“अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने संपर्क साधून कागदपत्रे द्यावीत. त्यांचा तपशीलही रिपोर्टमध्ये समाविष्ट करता येईल,” असे आवाहन पाटील यांनी केले.उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधितावर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.













Total Users : 3822259