धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/एस.बी. शेख) गाव झोपेत असताना धरणाच्या काठावर बिबट्याचा ‘नाईट शो‘ सुरू होता. कॉटन मार्केट धरण परिसरात २२ नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याने हरणाची शिकार केली आणि अख्खा भाग १ हादरून गेला.
अहमद खा मुनाफ खा यांच्या शेताजवळ रात्रीच्या सुमारास हा थरार घडला. हरणाची शिकार करून बिबट्या तिथेच घुटमळत होता. एवढ्यावरच न थांबता त्याने मेंढपाळांच्या शेळ्यांवरही झडप घालण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने मेंढपाळ जागे होते. बिबट्याची चाहूल लागताच त्यांनी एकच आरडाओरडा केला. आणि त्या आवाजाने बिबट्या अंधारात पळून गेला. शेळ्या वाचल्या, पण बिबट्याची दहशत मात्र गावातच राहिली.सकाळी हरणाची शिकार झाल्याची बातमी गावात पसरताच शेतकरी, शेतमजूर आणि मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिवसाढवळ्या शेतात जायचं कसं? रात्री पाणी भरायला जायचं कसं? प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेश जाधव यांनी तातडीने मोताळा वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.
आता वनविभाग काय कारवाई करतो, याकडे अख्ख्या धामणगाव बढेचं लक्ष लागले आहे.













Total Users : 3822127