मेहकर (हॅलो बुलढाणा) धरणात पाणी शिल्लक असताना सिंचनासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची? या सवालासह हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी पेनटाकळी धरणावर धडक दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाने पाणी सोडण्याची मागणी लावून धरली. ‘तुम्ही पाणी सोडा, अन्यथा आम्ही सोडतो!’ असा इशारा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून चर्चा, बैठका आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही, असा आरोप खरात यांनी केला. ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
“या धरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. त्यांच्या त्यागातून धरण उभे राहिले; मग स्थानिकांच्या सिंचनाकडे दुर्लक्ष का?” असा सवाल खरात यांनी उपस्थित केला. धरणातून चिखली, बुलढाण्यासह इतर भागांना पाणी मिळते, त्याचवेळी स्थानिक शेतकऱ्यांचे हितही जपले गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाणी सोडण्याचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीकडे असून, बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे खरात यांनी सांगितले. या बैठकीत सहभागी होऊन शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णयाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाणीवाटपाची पुरेशी माहिती न घेता विधाने करणे दुर्दैवी असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकीय नाट्य होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
मोर्चात किशोर गारोळे, आशिष रहाटे, निंबाजी पांडव, ॲड. आकाश घोडे, स्वातीताई नवले यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले. आंदोलनस्थळी सिंचन, महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आश्वासन मिळाले; आता पाणी कधी?
मोर्चानंतर दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाले. मात्र, बैठक झाली म्हणजे प्रश्न सुटला असे होणार नाही. प्रत्यक्ष सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कधी होणार, याकडे मेहकर–लोणार परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केवळ आश्वासन नको; शेतात पाणी पोहोचावे, अशी मागणी खरात यांनी केली.





Total Users : 3713186