बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्वतःला आधाराची गरज असताना तो दिव्यांग वडिलांचा आधार बनला! खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी उचलणाऱ्या खामखेडच्या ओम निंबाजी तायडेची कहाणी मन हेलावणारी आहे. या लेकराच्या संघर्षाला आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी मदतीचा हात देत जगण्याची नवी उमेद दिली.
मोताळा तालुक्यातील अवघ्या १५-१६ वर्षीय ओमवर कौटुंबिक संकटामुळे वडिलांच्या सांभाळाची जबाबदारी आली. घरगुती कामांतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात दोघांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. मात्र, परिस्थितीपुढे गुडघे टेकण्याऐवजी त्याने व्यवसायातून उभे राहण्याची जिद्द दाखवली.
ओमने वडिलांसह बुलढाण्यातील मातोश्री जनसंपर्क कार्यालय गाठून संजुभाऊंसमोर व्यथा मांडली. छोटासा व्यवसाय करण्यासाठी जागेची विनंती केली. त्याची परिस्थिती ऐकून संजुभाऊंनी तातडीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली; व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.
अडचणीच्या वेळी मिळालेल्या या साथीने बापलेक भावुक झाले. ओमच्या मेहनतीला आता मदतीची जोड मिळाली आहे. त्याच्या वडिलांच्या सांभाळासाठी आणि छोटा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. जागेचे आश्वासन प्रत्यक्षात उतरल्यास त्याच्या स्वावलंबनाच्या वाटेला आणखी बळ मिळेल.
यावेळी बबलू मावतवाल, ज्येष्ठ पत्रकार अजय बिल्लारी, नंदू जाधव, सांडू पाटील, बबलू शेठ आणि विशाल शेळके उपस्थित होते.ओमच्या जिद्दीला सलाम आणि त्या जिद्दीच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या संजुभाऊंच्या माणुसकीलाही सलामचं!





Total Users : 3708529