जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) दुष्काळाने आर्थिक कोंडी केलेल्या बळीराजाला आता पीककर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही अटींचा बागुलबुवा उभा करून कर्जासाठी अडविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जळगाव जामोद येथील भारतीय स्टेट बँकेत सातबाऱ्यावर पतसंस्थेचा बोजा असलेल्या अथवा मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळविताना अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित कर्जांची नियमित परतफेड सुरू असतानाही अडवणूक का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी आंदोलक अक्षय पाटील यांनी शेतकऱ्यांसह बँकेत धडक दिली. अनावश्यक अटींचा अडसर दूर करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या, अशी मागणी करण्यात आली.
इतर काही राष्ट्रीयीकृत बँका पतसंस्थेचा बोजा असतानाही नियमानुसार कर्ज देत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. मग स्टेट बँकेतच अडथळे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
पुढील हंगामासाठी पैशांची निकड असताना कर्जप्रक्रियेतील विलंबाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बँक प्रशासनाने पात्रतेचे निकष स्पष्ट करून अर्जांवर विनाविलंब निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.“शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला नाही, तर बँक प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा अक्षय पाटील यांनी दिला.





Total Users : 3713188