देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) अवैध रेती वाहतुकीसाठी जमलेल्या टिप्परवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धाड टाकत एकाच कारवाईत नऊ टिप्पर जप्त केले. जुने मंडपगाव शिवारात २ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम ३ नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत, तब्बल १६ तास चालली. रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चाललेल्या या कारवाईने अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीसाठी एकत्र आलेल्या नऊ टिप्परवर पथकाने छापा टाकला. जप्त केलेली वाहने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आणून उभी करण्यात आली आहेत. या मोहिमेत महसूल विभागासोबत पोलीस पथकही सहभागी झाले होते. एकाच ठिकाणी नऊ टिप्परवर झालेली कारवाई हे या मोहिमेचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी आणि उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांनी कारवाईत महत्त्वाची साथ दिली. महसूल पथकात मंडळ अधिकारी पी. टी. जायभाये, विजय हिरवे, तलाठी सुमित जाधव, संजय हांडे, शिपाई पंजाबराव ताठे, महसूल सेवक रामेश्वर शेरे आणि चालक म्हस्के यांचा समावेश होता





Total Users : 3713437