बारामती (हॅलो बुलढाणा) हातात बुके घेऊन आलेल्या हल्लेखोराने क्षणात पिस्तूल रोखले अन् गोळीबारासह सत्तूराने वार केले! बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याच्या तपासात आता बुलढाणा जिल्ह्याचे कनेक्शन समोर आले आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये खामगाव तालुक्यातील पिंपरी गवरी येथील मूळ रहिवासी पार्थ वासुदेव अवथळे या १९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:१० वाजता पालखी महामार्गावरील बारामती विमानतळ रेल्वे ब्रिजपुढे पायलट ढाब्यासमोर हा हल्ला झाला. राणा सूर्यवंशी आणि फिर्यादी लक्ष्मीकांत सूर्यवंशी उभे असताना स्कुटरवरून दोघे आले. त्यांपैकी एकाने बुके देण्याचा बहाणा करत पिस्तुलातून गोळीबार केला आणि लोखंडी सत्तूराने वार केले. राणा यांच्या उजव्या दंडावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. सहा ते सात विशेष पथकांतील अधिकारी आणि कर्मचारी आरोपींच्या मागावर होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पुणे शहर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.
चौकशीत दोन लाखांच्या सुपारीचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्ञानदेव महादेव शिंदे (५०), सध्या रा. थोरातनगर, भिगवण, याने हल्ल्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. पार्थ सध्या पुण्यातील कर्वेनगर येथे राहत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे.
पार्थ आणि ज्ञानदेव यांना २० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्रविषयक तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्यामागचे नेमके कारण काय? आणखी कोणाचा सहभाग आहे?
या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करत आहेत. बारामतीतील या हल्ल्याच्या तपासात बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचे नाव आल्याने प्रकरणाला जिल्ह्याच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे.







Total Users : 3642873