spot_img
spot_img

देऊळगाव राजावर शोककळा! उंबरखेड फाट्यावर काळाचा घाला; MBA शिकणाऱ्या २४ वर्षीय वैष्णवी घुगेची स्वप्ने क्षणात उद्ध्वस्त! स्विफ्ट डिझायरची विद्युत खांबाला भीषण धडक; दोन गंभीर!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या अवघ्या २४ वर्षीय तरुणीचा प्रवास एका भीषण अपघाताने कायमचा थांबला! चिखलीहून देऊळगाव राजाकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा उंबरखेड फाट्याजवळ रविवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वैष्णवी बद्रीनाथ घुगे (२४) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

एमएच २८ बीके ८७१८ क्रमांकाची कार एचपी पेट्रोल पंपाजवळ दुभाजकावर आदळली आणि थेट नगरपालिकेच्या विद्युत खांबाला धडकली. कारमध्ये पाच महिला आणि दोन पुरुष असे सात प्रवासी होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गंभीर जखमी वैष्णवीला देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दोन गंभीर जखमींना जालन्याला हलविण्यात आले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत.

वैष्णवी ही भगवान बाबा कॉलनीतील शिक्षक बद्रीनाथ घुगे यांची कन्या होती. तिचे एमबीएचे शिक्षण सुरू होते. उच्च शिक्षण, करिअर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या वैष्णवीवर काळाने अचानक घाला घातला!

ज्या घरात लेकीच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगत होती, त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला! वैष्णवीच्या अकाली निधनाने देऊळगाव राजा परिसर सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!