spot_img
spot_img

EXCLUSIVE स्वप्नांना सीमा नसतात! चिखलीची तंजिला डॉक्टर होण्यासाठी घेणार परदेशात भरारी; पत्रकार राजाभाईंच्या लेकीचा किर्गिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग खुला!पत्रकार संघाकडून सत्कार; ‘हॅलो बुलढाणा’कडूनही भावी डॉक्टरला मनःपूर्वक शुभेच्छा!

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) डोळ्यांत डॉक्टर होण्याचे स्वप्न, अभ्यासात सातत्य अन् पाठीशी कुटुंबाचा विश्वास! या बळावर चिखलीची कन्या कु. तंजिला इफ्तेखार खान आता परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी भरारी घेण्यास सज्ज झाली आहे. चिखली तालुका पत्रकार संघाचे सदस्य इफ्तेखार खान ऊर्फ राजाभाई यांची कन्या तंजिला हिचा किर्गिझस्तानमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच ती रवाना होणार आहे.

सामान्य कुटुंबातील तंजिलाने डॉक्टर होण्याचे ध्येय लहानपणापासून जपले. मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर तिने त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तिच्या या यशानिमित्त चिखली तालुका पत्रकार संघाने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुलीही उच्च शिक्षणात आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. आपल्या मुलीच्या स्वप्नाला बळ देणे ही पालकांची जबाबदारी आहे, अशी भावना राजाभाईंनी व्यक्त केली. शिक्षणाची व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत चौकशी करूनच परदेशी शिक्षणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तंजिलाच्या तयारीत चिखलीतील नीट व जेईई व्हिजन इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पहिल्यांदाच मुलगी इतक्या दूर जाणार असल्याने कुटुंबाला सुरुवातीला चिंता वाटली. मात्र तिची मानसिक तयारी, ठाम निर्धार आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे त्या चिंतेला आता अभिमानाची जोड मिळाली आहे. पत्रकार संघाच्या सत्कारामुळे तंजिलाचे मनोबल वाढल्याचे सांगत राजाभाईंनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे, उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंधणे, संतोष लोखंडे, रेणुकादास मुळे, इफ्तेखार खान, रवींद्र फोलाने, सत्य कुटे, कमलाकर खेडेकर, रमीज राजा, सय्यद साहिल आणि भारत जोगदंडे उपस्थित होते.

तंजिलाची ही वाटचाल उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रेरणा देणारी आहे. मुलींच्या शिक्षणाला पाठबळ दिल्यास त्यांच्या कर्तृत्वाला नवे आकाश मिळू शकते, हा विश्वास या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.

‘तंजिला, ज्ञानाची उंची गाठ आणि रुग्णसेवेतून चिखलीचे नाव उज्ज्वल कर!’ ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराकडून तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!