spot_img
spot_img

बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायचा होता… पण लेकीच्या अंत्ययात्रेत आक्रोश करण्याची वेळ आली! नवव्या महिन्यात स्वाती अन् गर्भातील बाळाचा मृत्यू; माहेर सिंदखेडराजाच्या राहेरीत, सासर पैठणच्या विहामांडव्यात – दोन तोळ्यांच्या अंगठीसाठी छळ अन् उपचार टाळल्याचा वडिलांचा आरोप; सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) बाळाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर लेकीच्या अंत्यसंस्काराची वेळ आली! सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील माहेरवाशीण आणि पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील सासर असलेल्या स्वाती ऊर्फ समीक्षा विशाल निंबाळकर व तिच्या गर्भातील बाळाचा २५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी वडील सदाशिव शंकर देशमुख यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ८५, १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 

पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर आणि ऐश्वर्या नामक महिला अशा चौघांविरुद्ध तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत.

स्वातीचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी झाला होता. सुरुवातीला चांगली वागणूक मिळाल्यानंतर मूल होत नसल्यावरून मानसिक छळ सुरू झाल्याचे वडिलांनी म्हटले आहे. माहेराहून दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणण्यासाठी तगादा लावून, अंगठी न आणल्यास सोडून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप आहे. पाच ग्रॅमची अंगठी दिल्यानंतरही त्रास सुरू राहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

डॉक्टरांनी इशारा दिला; तरी रुग्णालयात दाखल केले नाही?

उपचारांनंतर गर्भधारणा झालेली स्वाती नऊ महिन्यांची गर्भवती होती. नियमित तपासणीसाठी नेले जात नसल्याचे तिने आईला सांगितल्याचा उल्लेख जबाबात आहे. ६ सप्टेंबरच्या तपासणीदरम्यान गर्भातील पाणी कमी आणि बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा वडिलांचा दावा आहे. तातडीने दाखल करून सिझेरियन करण्याचा सल्ला देऊनही सासरच्यांनी तिला घरी नेल्याचा आरोप त्यांनी केला.

मुलीला माहेरी आणून उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवूनही नकार मिळाल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने मायलेकरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि संबंधितांची जबाबदारी वैद्यकीय अहवाल व तपासातून स्पष्ट होईल. संबंधितांची बाजू उपलब्ध झालेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!