घाटबोरी (हॅलो बुलढाणा) फेरफार नोंदींसाठी प्रतीक्षा, वारस नोंदींची रखडपट्टी, शेतरस्त्यावरून वाद अन् सीमांच्या प्रश्नावरून तणाव! महसुली प्रकरणांमध्ये अडकलेल्या मेहकर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना आता सामंजस्याने तोडगा काढण्याची संधी मिळणार आहे. उद्या, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मेहकर तहसील कार्यालयात महसूल लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार निलेश मडके यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
महसुली वाद रखडला की केवळ कागदपत्रे अडकत नाहीत; संबंधितांचा वेळ, पैसा आणि श्रमही खर्च होतात. वाद कायम राहिल्याने दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होतो. या प्रलंबिततेवर सामंजस्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशान्वये ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.
या लोकअदालतीमध्ये वाटपपत्र, फेरफार नोंदी, वारस नोंदी, शेतरस्ता, शिवरस्ता, पाणंद रस्त्यांवरील वाद, सीमा वाद, अतिक्रमण आणि कुळ कायद्यांतर्गत तडजोडीस पात्र प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. संबंधित पक्षकारांची परस्पर संमती असल्यास प्रकरणांमध्ये जलद आणि सुलभ पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मात्र, संधीचा लाभ घ्यायचा असेल तर आजच पाऊल उचला! संबंधित नागरिकांनी आपल्या प्रकरणाची माहिती आज, ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा थेट मेहकर तहसील कार्यालयात सादर करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकअदालतीमध्ये प्रकरणाचा समावेश करून आवश्यक कार्यवाही करता येईल.
हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबरला मंडळ स्तरावर लोकअदालत झाली होती. आता तहसील स्तरावर नागरिकांना ही संधी उपलब्ध होत आहे.
दीर्घकाळ अडकलेल्या तडजोडपात्र महसुली वादांना स्थानिक पातळीवर तोडगा मिळवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी आपल्या प्रकरणांची माहिती वेळेत सादर करून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मडके यांनी केले आहे











Total Users : 3529925