spot_img
spot_img

BIG BREAKING! ठेवींचे पैसे गेले कुठे… अन् तीन वर्षांचे भाडेही थकले? बुलढाण्याच्या ‘धनलक्ष्मी’च्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा तपास; जागामालकाचे भाडे अन् वीजबिल थकीत असल्याची माहिती! आता आणखी दोन नामांकित पतसंस्थांतील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा ‘गुब्बारा’ फोडणार ‘हॅलो बुलढाणा’!

बुलढाणा, दि. ३० (हॅलो बुलढाणा) विश्वासाने ठेवलेला पैसा अडकल्यानंतर ठेवीदारांनी न्यायासाठी कुठे जायचे? बुलढाण्यातील धनलक्ष्मी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ठेवींच्या अपहारप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. ठेवीदारांच्या पैशांचा हिशेब आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने हा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१०/२०२६दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह एमपीआयडी अधिनियम १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. ठेवींच्या रकमेत अपहार झाल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेचे कार्यालय शहरातील र. नं. ३९३, सर्क्युलर रोड, चिंचोले चौक येथील बाहेकर कॉम्प्लेक्समध्ये आहे. या संस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांनी मूळ ठेवपावत्या आणि संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे स्वतः हजर राहून आपल्या ठेवींची नोंद करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. रोकडे यांनी केले आहे.

ठेवींच्या तक्रारींबरोबर भाडे थकबाकीचाही मुद्दा!

विशेष म्हणजे, पतसंस्थेने जागामालक श्री.बाहेकर यांचे तीन वर्षांपासून भाडे आणि वीजबिल थकवल्याची माहितीही समोर आली आहे.ठेवीदारांचा पैसा अडकलेला असताना संस्थेच्या आर्थिक व्यवहारांविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का?

दरम्यान, बुलढाण्यातील आणखी दोन नामांकित पतसंस्थांमधील कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात ‘हॅलो बुलढाणा’ लवकरच मोठा खुलासा करणार आहे. संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि संस्थांची बाजू घेऊन हा तपशील वाचकांसमोर मांडला जाईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!