धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक बिस्मिल्लाह शेख) धामणगाव बढे परिसरात पशूधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धामणगाव बढे बसस्थानक परिसरातून मध्यरात्री एका गाय चोरीला गेल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे 1.30 वाजताच्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी इंडिका कारचा वापर करून धामणगाव बढे बसस्थानक परिसरातून अंदाजे 14 ते 15 हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याचे समोर आले आहे. सदर गाय धामणगाव बढे येथील माजी उपसरपंच श्याम निमखेडे यांची असल्याची माहिती आहे.
या चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इंडिका कारमधून गाय नेताना काही व्यक्ती दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर व्हिडिओ आज सकाळपासून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणखी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाय चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर श्याम निमखेडे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
▪️पोलिसांपुढे आव्हान!
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिस प्रशासनाने परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.












Total Users : 3475070