सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) मलकापूर पांग्रा गावातील स्वच्छतेची अक्षरशः वाट लागली असून तुंबलेल्या गटारी, साचलेले सांडपाणी आणि वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तब्बल दीड महिन्यापासून डासांनी नागरिकांचे जगणे हैराण केले असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभावी डासनाशक फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावातील अनेक नाल्या घाण, कचरा आणि चिखलाने तुंबलेल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसून खड्डे, सखल भाग आणि रस्त्याच्या कडेला पाणी साचून डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही भागात शेणखताच्या ढिगाऱ्यांजवळही पाणी साचले असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गावात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या तक्रारी वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत. शासकीय आणि खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढत असताना ग्रामपंचायत मात्र परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पावसाळ्याचा चौथा महिना सुरू झाला, तरी नाल्यांची प्रभावी स्वच्छता आणि नियमित डासनाशक फवारणीचा अभाव कायम आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या साथीने गावात हातपाय पसरल्यानंतर प्रशासन धावणार का? ग्रामस्थांची मागणी आहे आम्हाला कागदोपत्री स्वच्छता नको, प्रत्यक्ष नाल्या साफ करा, सांडपाणी काढा आणि तातडीने फवारणी करा! वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने कामाला लावावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.












Total Users : 3470085