सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) पावसाळ्याचे तब्बल तीन महिने उलटले, तरी सिंदखेडराजा तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी केवळ जमिनीची तहान भागविण्याचे नाटक करीत असून, पिकांना आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने खरीप हंगाम उभा करणाऱ्या बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस यांसह मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. बी-बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी हिरवी स्वप्ने पेरली. मात्र पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. डोळ्यांसमोर पीक माना टाकत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता अधिकच गडद झाली आहे.
विहिरींमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आधारावर काही शेतकरी विद्युत पंपांद्वारे पिकांना जीवदान देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा आणि अनियमित विद्युत पुरवठा त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहे. एकीकडे आभाळाने पाठ फिरवली, तर दुसरीकडे वीज वितरण व्यवस्था शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे चित्र आहे.
सध्या खरीप पिकांसाठी प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सोयाबीन, तूर, कापूस आणि हळदीच्या उत्पादनाला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने शेतशिवारांची पाहणी करावी, तर वीज वितरण कंपनीने सिंचनासाठी अखंडित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे













Total Users : 3447044