बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर, मातृतीर्थ सिंदखेडराजा, संतनगरी शेगाव तसेच बुलडाण्याजवळील अजिंठा-वेरूळ अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. या जिल्ह्याला विशेष भौगोलिक महत्त्व असून कृषी, उद्योग आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्याने होत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रगतीबरोबरच त्यातील उणिवांबाबत प्रसारमाध्यमे आपल्या वृत्तांकनातून प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडतात. यातून प्रशासनाला विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिशा मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी आज केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. देवरे यांच्या हस्ते बुलडाणा रेसिडेन्सी, मलकापूर रोड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
‘जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका’हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. जिल्ह्यातील संतनगरी शेगाव आणि आनंद सागर, नैसर्गिक सौंदर्य लाभलेला राजूर घाट, वन्यजीवसंपन्न ज्ञानगंगा अभयारण्य, जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि गिरडा येथील पुरातन शिवमंदिर या पर्यटनस्थळांमध्ये देशांतर्गत पर्यटन, सॉफ्ट अॅडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट्ससारख्या पर्यटन उपक्रमांच्या विकासाच्या मोठ्या संधी आहेत. ही पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडलेली असून भविष्यात या परिसराचा पर्यटन कॉरिडॉर विकसित होऊ शकतो. पर्यटन विकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून पर्यटन आणि प्रसारमाध्यमांच्या परस्परपूरक भूमिकेमुळे पर्यटनवृद्धीला चालना मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम, छत्रपती संभाजीनगर येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक संचालक स्नेहा पाटील यांनी केले.‘बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनाच्या संधी आणि क्षमता वृद्धी व कौशल्य प्रशिक्षण’या विषयावरील सत्रात त्या मार्गदर्शन करत होत्या. स्वच्छ शहर आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापन’
या विषयावर नागपूर येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था चे संचालक डॉ. जयंत पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रसारमाध्यमांकडून आकांक्षा आणि अपेक्षा’ या विषयावर प्रेरक व्याख्याते डॉ. युगल रायलू यांनी मार्गदर्शन केले.पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकार कल्याण योजना, फॅक्ट चेक युनिट तसेच कार्यालयाच्या प्रसिद्धीविषयक कार्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली.केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा माध्यम प्रतिनिधींसोबत संवादही साधण्यात आला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थी वंदनाताई टेकाडे यांनी योजनेच्या लाभाचा अनुभव कथन केला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सौरभ वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी धनंजय वानखेडे यांनी केले.












Total Users : 3424903