संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील खांडवी शिवारातील एका ९० फूट खोल विहीरीत पडलेल्या काळविटास वनविभागाच्या चमूने सुखरुप वर काढून जीवदान दिले आहे. ही घटना दिनांक २३ शुक्रवारी मध्यरात्री शेतमालक श्रीकृष्ण कवरे पिकाला पाणी देत असताना घडली.
खांडवी शेत शिवारात ९० फूट खोल व भरपूर पाणी असलेल्या विहिरीत काळवीट पडल्याची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण विभागाची चमू व निसर्गप्रेमी छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहीरीच्या पाण्यात काळवीटाचा जीवन मरणाचा संघर्ष सुरु असतांना वन्यजीव विभागाचे खांडवी येथील वनपाल व्ही. बी. पाथ्रीकर , वनरक्षक एस. ए. निकाळजे यांच्यासह वनमजूरांचा समावेश असलेल्या टीमने सुयोग्य नियोजन करुन जाड दोराचा फास तयार केला व विहिरींची इत्यंभूत माहिती असलेले स्वतः मालक श्रीकृष्ण कवरे अधीक वेळ न दवडता,दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीत पाण्यातील काळविटास या फासात पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे अडकवले व काळवीटास कुठलाही त्रास होणार नाही, अशा पध्दतीने दोन्ही बाजूने रहाटाच्या सहाय्याने दोर ओढत वर काढले. शरीराचा फास सोडवून काळवीटास मोकळे करण्यात आले. मात्र विहीरीत पडतांनाच त्याच्या मांडीस मागील बाजूस जखम झाल्याचे आढळून आले होते व विहीरीबाहेर काढल्यानंतर काळवीटाचा रक्तदाब कमी झाल्याने ते हालचाल न करता अर्धातास पडून राहिले. मात्र सदर बाब ही सामान्य असून घाबरल्याने हा प्रकार घडत असल्याचे सांगत वनपालांनी सदर काळवीटास एकटे सोडले व दूरवरुन निरीक्षण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच काळवीटाने स्वतःच जखम चाटून बरी करण्याचा नैसर्गिक प्रयत्न केला व ते विद्युतवेगाने व चपळतेने त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेले.
वन्यजीव संरक्षण विभागाच्या चमूने नियोजनबद्ध हालचाली करुन एका काळविटास जीवनदान दिल्याने परीसरातील गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. वनविभागाच्या टीममध्ये वनपाल व्ही. बी. पाथ्रीकर, वनरक्षक एस. ए. निकाळजे , इस्लामपूर बीट वनमजूर बी. झेड. जामुनकर, महेंद्र तायडे ,नरेश खालपे , जवाहरलाल जामुनकर, श्रीकृष्ण कवरे , ओम कवरे , आदित्य कवरे, चेतन बगे व प्रसिध्द वन्यजीव तथा निसर्गप्रेमी छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांचा समावेश होता.





Total Users : 3656508