spot_img
spot_img

EXCLUSIVE! पिकांना पाण्याचा ठणठणाट… रस्त्यांवर मात्र टँकरचा थाट! संतप्त शेतकऱ्यांनी अडवले टँकर; नायब तहसीलदारांच्या सूचनेनंतर पाणी टाकणे बंद!

मेहकर (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना मेहकर-रिसोड रस्त्याच्या कामासाठी टँकरद्वारे पाणी वापरले जात असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. शेतातील हळद आणि इतर पिके पाण्याअभावी वाळत असताना रस्त्यावर पाणी टाकण्याला प्राधान्य कशासाठी, असा रोखठोक सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी टँकर अडवले.

पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांसाठी महत्त्वाचा ठरत असताना रस्त्यावर होणारा पाण्याचा वापर शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. एका बाजूला पाणी नसल्याने संकटात सापडलेली शेती, तर दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेला पाण्याचा वापर; या परिस्थितीवर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. शेतीला पाणी नाही, मग रस्त्यावर पाण्याची नासाडी कशासाठी? असा त्यांचा थेट सवाल आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहकरच्या नायब तहसीलदारांनी संबंधितांना रस्त्यावर पाणी न टाकण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर टँकरद्वारे पाणी टाकणे बंद करण्यात आले.

मात्र, या प्रकाराने पाणीवापराच्या प्राधान्यक्रमाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी पाण्याअभावी वाळणाऱ्या पिकांकडे दुर्लक्ष कसे चालेल, हा शेतकऱ्यांच्या संतापातून पुढे आलेला मुद्दा आहे. प्रशासनाच्या सूचनेनंतर पाणी टाकणे थांबले; पण टंचाईतील पाणीवापराबाबत स्पष्ट नियोजनाची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!