spot_img
spot_img

BREAKING! कारंजा चौकात मध्यरात्री ‘तलवार थरार’! नगरसेवक आकाश दळवींवर हल्ल्याचा प्रयत्न; दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारींनी खळबळ आरतीदरम्यान वाद पेटला; “तुकडे करून चौकात फेकतो” अशी धमकी दिल्याचा दळवींचा आरोप – CCTV फुटेजवरून उलगडणार सत्य!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल रात्री शहरातील कारंजा चौक परिसरात रॅलीनंतर झालेल्या कथित वादाने गंभीर वळण घेतले आहे. दुर्गादेवी मंदिरातील आरतीदरम्यान सुरू झालेल्या किरकोळ वादातून भाजपचे नगरसेवक आकाश विजय दळवी यांना शिवीगाळ, मारहाण आणि तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात एकच खळबळ उडाली असून, दळवी यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आकाश दळवी आपल्या सहकाऱ्यांसोबत कारंजा चौकातील दुर्गादेवी मंदिरात आरती करीत होते. त्यावेळी निखिल शर्मा आणि त्यांची दोन मुले आर्यन शर्मा व वंश शर्मा यांनी राजकीय वादातून हुज्जत घालत अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिलक तोंडीलायता यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी दळवी हे निखिल शर्मा यांच्या घरासमोर गेले असता परिस्थिती आणखी चिघळल्याचे सांगण्यात येते. शर्मा यांनी घरातून लोखंडी तलवार, रॉड आणि बंदुकीसारखे दिसणारे शस्त्र आणल्याचा आरोप दळवींनी केला आहे. “आता बोलाव तुझ्या आमदार महालेला… तुझे तुकडे करून कारंजा चौकात फेकतो,” अशी धमकी देत आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचेही दळवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

“आम्ही वेळीच घटनास्थळावरून निघालो नसतो, तर आमचा जीव गेला असता,” अशी प्रतिक्रिया आकाश दळवी यांनी दिली. संबंधितांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी संकलित करण्यास सुरुवात केली आहे. एका फुटेजमध्ये हातात तलवार असल्यासारखी वस्तू घेऊन एक तरुण कारंजा चौकाच्या दिशेने धावताना दिसत असल्याची माहिती आहे. शर्मा पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते; मात्र अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.

दुसरीकडे, शर्मा कुटुंबीयांनीही आकाश दळवी आणि अन्य दहा ते पंधरा जणांविरोधात तक्रार दिली आहे. दळवी यांनी कार्यकर्त्यांसह रात्री घरात घुसून दहशत निर्माण केली तसेच छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमका हल्लेखोर कोण आणि पीडित कोण, याचे सत्य आता CCTV फुटेज व पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!