जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) ‘हर हर महादेव!’, ‘बम बम भोले!’ आणि ‘जय महाकाल!’च्या गगनभेदी जयघोषाने सोमवारी जळगाव जामोद शहर अक्षरशः दणाणून गेले! श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त दि. ७ सप्टेंबर रोजी अंबिका माता सार्वजनिक कावड यात्रा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भगवे ध्वज, ढोल-ताशांचा कडकडाट आणि शिवभक्तांचा उसळलेला उत्साह यामुळे संपूर्ण शहरावर जणू भगवी लाटच अवतरली होती.
शहरातील संत तुकाराम चौकातून कावड यात्रेला दिमाखदार सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेतील कावडधारी, आकर्षक धार्मिक देखावे आणि महादेवाच्या घोषणांनी मिरवणुकीची शोभा वाढविली. शिवभक्तांनी धोपेश्वर येथून पवित्र पूर्णा जल आणले होते. महिला, पुरुष, युवक आणि बालशिवभक्तांच्या प्रचंड सहभागामुळे मिरवणुकीला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले.
मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी कावडधाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले. तरुणाईच्या जोशपूर्ण जयघोषाने शहरातील वातावरण शिवमय झाले. कावड यात्रा जामोद रोडवरील भगवान निळकंठेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर पवित्र पूर्णा जलाने महादेवाचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला.
धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोख्याचा बुलंद संदेश देणारा हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम मच्छरे, पोलीस निरीक्षक सचिन बागुल आणि एपीआय गणेश कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी व आरसीपी पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.












Total Users : 3415362