बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा पोलिसांमार्फत ‘मिशन परिवर्तन‘ ही अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवण्यात येत असली तरी, शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू आहे. नुकताच एलसीबीच्या पथकाने मोताळा येथे गांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून,५० हजार रुपये प्रति किलो दराचा एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा एक किलो १७० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.या कारवाईवरून गांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट होत असून, गांजाचा धुराळा उडत असल्याचे चित्र आहे.
मोताळा शहरासह बुलढाणा शहर व जिल्ह्यात गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा विक्री जोरात सुरू आहे. गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम बुलढाणा जिल्ह्यात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. २० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री उघडपणे होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगारापुरतीच मर्यादित होती, परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.हा गांजा येतो कुठून? याची पाळेमुळे पोलीस खात्याने खणली पाहिजे, अशी मागणी उठत आहे. दरम्यान ६ सप्टेंबरच्या रात्री एलसीबी पथकाने टाकलेल्या छाप्यात १ किलो १७० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली.पाचपीर दर्गा परिसरात गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने ६ सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत संशयित म्हणून शेख साहिल शेख रफिक (वय १९) रा. पाचपीर दर्गाजवळ, मोताळा याला ताब्यात घेत त्याच्याकडून ५० हजार रुपये प्रति किलो दराचा एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थागुशा. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल इंगळे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिस ठाण्यात शेख साहिल याच्याविरुध्द अप क्र. ४३४/२०२६ कलम ८ (क), २० (ब) १० (२) एनडीपाएस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले हे करीत आहे.
▪️निर्जन ठिकाणी गांजाचे झुरके
गांजाच्या नशेची सवय लागलेल्या १४ ते १६ वयोगटांतील मुले या चुकीच्या गोष्टीकडे वळतांना दिसतात. त्यांना या गोष्टी सहज किंवा मित्राच्या, मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडून उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. ते निर्जन ठिकाणावर गांजा ओढतांना दिसून येतात. मुलांसोबत चुकीच्या संगतीचा किंवा पिअर प्रेशरमुळे ही मुले या नशेच्या आहारी जातात. यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. या मुलांचे समुपदेशन करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.












Total Users : 3414591