spot_img
spot_img

डम डम डमरू वाजला… अन् संजूभाऊंच्या हाती भगवा येताच जळगाव जामोद दणाणले!हजारो शिवभक्तांच्या साक्षीने कालभैरव कावड यात्रेचा महासोहळा; आ. डॉ. संजय कुटेंचा उत्स्फूर्त सहभाग, पूर्णा जलाने निळकंठेश्वराचा जलाभिषेक

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) ‘डम डम डम डम डमरूवाला, पार्वतीपती कैलासवाला… भोळा महादेव उघड तिसरा डोळा!’ या गाण्याचा निनाद, ढोल-ताशांचा कडकडाट आणि हजारो शिवभक्तांच्या मुखातून उमटणारा ‘हर हर महादेव’चा महागजर… त्यात आमदार डॉ. संजय कुटे यांनी हातात भगवा ध्वज घेताच संपूर्ण जळगाव जामोद शहर अक्षरशः दणाणून गेले!

श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी कालभैरव कावड यात्रा मंडळाच्या वतीने भव्य कावड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेश शर्मा यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आ. डॉ. संजय कुटे स्वतः यात्रेत सहभागी झाल्याने शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला.

कालभैरव मंदिर परिसरातून सुरू झालेली कावड यात्रा जामोद रोडवरील भगवान निळकंठेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा, आकर्षक धार्मिक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे शहरात भक्तीचा महापूर उसळला होता. महिला, युवक आणि आबालवृद्धांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी कावडधारी शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत केले.

यात्रा निळकंठेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर पवित्र पूर्णा जलाने भगवान महादेवाचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी दर्शन घेत सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

सोहळा शांततेत पार पडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम मच्छरे, पोलीस निरीक्षक सचिन बागुल, एपीआय गणेश कायंदे, नागेश मोहोड, अमोल पंडित, स्नेहा शेडगे यांच्यासह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!