बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांच्या कस्टडीतून धूम ठोकणाऱ्या प्रतापसिंग सुरजसिंग बावरी याचा अखेर बुलढाणा पोलिसांनी भुसावळमध्ये ‘गेम ओव्हर’ केला! तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत प्रतापसिंगसह त्याला मदत करणारा भाऊ तुफानसिंग बावरी यालाही दीपनगर, भुसावळ येथून ताब्यात घेतले. या धडाकेबाज कारवाईमुळे “फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं, फायर है मैं!” अशीच बुलढाणा पोलिसांची दमदार कामगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
MIDC दसरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक १०९/२०२६, कलम ३०३(२), ३(५) बीएनएसमधील आरोपी प्रतापसिंग बावरी आणि कपूरसिंग बावरी यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, पहाटे सुमारे ३ वाजता प्रतापसिंगने टॉयलेटच्या खिडकीतून पलायन केले. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८४९/२०२६, कलम २६२ बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
फरार आरोपीला त्याचा भाऊ तुफानसिंग अटकेपासून वाचण्यासाठी मदत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांचा माग काढत दीपनगरमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून बजाज पल्सर मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने पीएसआय अविनाश जयभाये, हेडकॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, चांद शेख, विजय पैठणे, गणेश पाटील, राजू आडवे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, निलेश राजपूत आणि कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी MIDC दसरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.











Total Users : 3408141