बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष आता थेट व्यक्तिगत आणि वादग्रस्त वक्तव्यांपर्यंत पोहोचला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी रॅलीत धनुष्यबाण ताणत ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. “एखाद्या माणसाने ‘बाप तो बाप रहेगा’ म्हटले तर ठीक आहे; पण एखाद्या बाईने मी बाप आहे म्हटल्यास बापासारखं शरीर कुठून आणणार?” अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली. या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“राजकारणातील बाप कोण, हे योग्य वेळी दाखवून देऊ,” असा थेट इशाराही गायकवाड यांनी दिला. मात्र त्याचवेळी श्वेता महाले या आपली बहीण आणि ताई असल्याचे सांगत त्यांनी संबंधांची आठवण करून दिली. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र होतो. एका ताटात, एका चमच्याने जेवलो. त्यामुळे समोरासमोर येण्याचा प्रश्नच नाही,” असे ते म्हणाले.
वाढदिवसाच्या रॅलीत वीज गेल्यामुळे आपल्यावर करण्यात आलेले आरोप गायकवाड यांनी फेटाळून लावले. “मी कर्नाटकात होतो. त्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. माझ्याकडे हरामाचा पैसा नाही आणि वाढदिवसासाठी पैशांची उधळपट्टीही करणार नाही,” असे ते म्हणाले. वाढदिवसाला माणसे भाड्याने आणणे, अधिकारी आणि पोलिसांना कामाला लावणे तसेच लोकांना शुभेच्छांसाठी ओढून आणणे, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता जोरदार चिमटे काढले.
“ज्यांना कुत्रेही हुंगत नाहीत, ते ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ बनून नाचत आहेत,” असा आणखी एक आक्रमक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. महायुती एकसंघ असल्याचा दावा करतानाच स्थानिक भाजप काँग्रेसच्या दावणीला बांधली जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी महालेंना दिला.
‘बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत आला’ या महालेंच्या टीकेलाही गायकवाड यांनी उत्तर दिले. “बुलढाण्याच्या विकासाचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळत आहे. शहरात विकास झाला की कचरा, हे जनता ठरवेल,” असे ते म्हणाले. मात्र या आरोप-प्रत्यारोपांत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे महायुतीमधील संघर्ष आता कोणत्या टोकाला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3410446