खामगाव/शेगाव (हॅलो बुलढाणा) ज्येष्ठागौरी पूजनासाठी महालक्ष्मी मूर्तींचे मुखवटे आणि बॉडी खरेदी करण्यासाठी शेगावात आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील व्यापाऱ्याचा खामगावमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विकास रामदास वाणी (वय ४३) यांचा मृतदेह ३ सप्टेंबर रोजी सकाळी अग्रसेन चौकात आढळला. या मृत्यूमागे शेगावमध्ये झालेली कथित मारहाण कारणीभूत असल्याचा आरोप करत मावसभाऊ रामेश्वर चौधरी यांनी सागर खानझोडे व अन्य ४ ते ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, विकास वाणी आणि रामेश्वर चौधरी हे चालक नूर शेख याच्यासह २ सप्टेंबर रोजी मालवाहू वाहनाने शेगावात आले होते. त्यांच्याकडे सुमारे ५ लाख ४० हजार रुपये होते. त्यातून ३ लाख ६४ हजार रुपयांचा महालक्ष्मी मुखवटे व बॉडीचा माल खरेदी करण्यात आला.
माल वाहनात भरत असतानाच जुन्या बिलावरून वाद उफाळला. सागर खानझोडे व त्याच्या साथीदारांनी विकास वाणी यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून कारखान्यावर नेल्याचा आरोप आहे. तेथे पोटाला चाकू लावून, जमिनीवर पाडत छातीवर बसून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मालवाहू वाहनातील संपूर्ण माल, उर्वरित १ लाख ८६ हजार रुपये आणि कागदपत्रेही हिसकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर विकास वाणी कसेबसे खामगावला पोहोचले आणि अतिथी लॉजमध्ये खोली घेतली. मात्र काही वेळातच अग्रसेन चौकात ते कोसळले. खामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शेगाव पोलिसांकडून तक्रारीची चौकशी सुरू होती. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून, महालक्ष्मीच्या खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याची ही यात्रा अखेरच्या प्रवासात कशी बदलली? या प्रश्नाचे उत्तर आता पोलिस तपासातूनच मिळणार आहे.













Total Users : 3393689