डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मेहकर–डोणगाव राज्य महामार्ग बुधवारी रात्री दोन बालमित्रांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरला! नागापूर शिवारात दुचाकी आणि समोरून आलेल्या अज्ञात मालवाहू वाहनाची भीषण धडक होऊन डोणगाव येथील साहिल शेख जफर (वय १६) आणि साकिब शकील कुरेशी (वय १८) या दोन जिवलग मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण डोणगाव परिसर सुन्न झाला आहे.
बुधवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास साहिल आणि साकिब दुचाकीने डोणगावकडे परतत होते. नागापूर शिवारात समोरून भरधाव आलेल्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, एक मित्र रस्त्यावर कोसळला; तर दुसरा रस्त्यापासून तब्बल दहा फूट दूर फेकला गेला. गंभीर दुखापतींमुळे दोघांनीही जागीच प्राण सोडले.
साहिल आणि साकिब एकाच गल्लीत राहणारे, एकाच शाळेत शिकणारे आणि कायम सोबत दिसणारे जिवाभावाचे मित्र होते. सण असो, उत्सव असो किंवा दैनंदिन फिरणे-दोघांची मैत्री परिसरात परिचित होती. मात्र, नियतीने त्यांच्या मैत्रीचा असा रक्तरंजित शेवट केल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह मेहकर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, दुचाकीला धडक देऊन फरार झालेल्या मालवाहू वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. महामार्गावरील अनियंत्रित वेग आणि बेदरकार वाहतुकीला आणखी किती बळी गेल्यानंतर लगाम बसणार, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.













Total Users : 3389822