spot_img
spot_img

BREAKING सीसीटीव्हीत दिसला… शेतात पळाला… पोलिसांनी पाठलाग करून पकडला! लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा! तीन ते चार किलोमीटर थरारक पाठलाग; २० वर्षीय आरोपीला अटक, पाच दुचाकींसह १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

लोणार (हॅलो बुलढाणा/ राहुल सरदार) पोलिसांची चाहूल लागताच रस्ता सोडून शेतात धूम ठोकली; पण पोलिसांनीही पाठ सोडली नाही! तब्बल तीन ते चार किलोमीटर पाठलाग करत स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने लोणार पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अर्जुन बबन राठोड (वय २०, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकाश किसन सरकटे यांनी शेतात उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक एमएच-२८-बीएस-५६७१ ही ३० ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरीला गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ नोंदवून तपास सुरू केला.

कॅमेऱ्याने दिला धागा; पाठलागाने गाठला आरोपी!

लोणार-मंठा मार्गावरील सीसीटीव्ही तपासताना लोणार-तळणी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या फुटेजमध्ये दुचाकी घेऊन जाणारा संशयित दिसला. शोध सुरू असताना तो मंठा-उसवद मार्गावर आढळला. पोलिसांनी पाठलाग सुरू करताच त्याने शेतात पळ काढला. मात्र, पथकाने चिकाटीने पाठलाग करून मंठा तालुक्यातील मुरुमखेडा शिवारात त्याला शेतकऱ्यांच्या मदतीने पकडले.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत लोणार पोलीस ठाण्यात दाखल आणखी तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील त्याचा सहभाग समोर आला. आतापर्यंत त्याच्याकडून तीन स्प्लेंडर प्लस, एक एचएफ डिलक्स आणि एक बजाज सीटी हंड्रेड अशा पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण अंदाजित किंमत १ लाख ५३ हजार रुपये आहे. यातील तीन दुचाकींवर नोंदणी क्रमांक नसल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात संजय जाधव, नितीन खराडे, अनिल शिंदे, गणेश तामसकर, तेजराव भोकरे, गणेश लोढे, सुनील गाडे व नीता शिंदे यांचा सहभाग होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!