सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/ एकनाथ माळेकर) अवैध दारूचा महापूर वाहत असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे हिवरखेड पूर्णा येथील कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी घेऊन गेलेल्या सरपंच, महिला व ग्रामस्थांना किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी
अरेरावी करीत उद्धट वागणूक दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान त्यांना निलंबित करून कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिवरखेड पूर्णा गावात व परिसरात
अवैध देशी विदेशी दारू सर्रास विकली जात असल्याने
गावातील तरुण पिढी बरबाद होत आहे, कौटुंबिक वाद वाढत आहेत. त्यामुळे ही अवैध दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी या मागणीसाठी हिवरखेड येथील लोकनियुक्त सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सुज्ञ नागरिकांनी 19 ऑगस्ट रोजी किनगाव राजा पोलिस स्टेशन गाठले.ठाणेदार संजय मातोंडकर यांना दारूबंदीसाठी मागणी केली असता त्यांनी अपमानास्पद व उद्धट वर्तणूक दिल्याचा आरोप
ग्रामस्थांनी केला आहे.परिणामी ठाणेदारांना निलंबित करण्यात यावे तसेच अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करून अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.













Total Users : 3381722