जालना/सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या गुंज गावच्या अवघ्या २४ वर्षीय एसआरपीएफ जवानाने कर्तव्यावर असतानाच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्ये घडली. या घटनेमुळे एसआरपीएफ कॅम्पसह जवानाच्या मूळ गावी प्रचंड खळबळ उडाली आहे.
अजय माधवराव वाकोडे (वय २४, रा. गुंज, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे गंभीर जखमी जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय सोमवारी रात्री जालना एसआरपीएफ कॅम्पमध्ये कर्तव्यावर होता. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याने कॅम्पमध्येच एसएलआर बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली. गोळी मानेत लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
गोळीचा आवाज ऐकताच कॅम्पमधील सहकारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अजय वाकोडे हा सुमारे दीड वर्षापूर्वीच एसआरपीएफमध्ये भरती झाला होता. ऐन उमेदीच्या वयात आणि कर्तव्यावर असताना त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्यावर कोणता ताण होता? घटनेपूर्वी नेमके काय घडले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॅम्पमध्ये धाव घेत एसएलआर बंदूक ताब्यात घेतली. घटनास्थळाची परिस्थिती, शस्त्राचा वापर आणि अजयच्या सहकाऱ्यांचे जबाब तपासले जात आहेत. या आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे.













Total Users : 3373189