spot_img
spot_img

शेतकऱ्याच्या लेकीची ऐतिहासिक गरुडझेप! पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच फेरीत मुंबईच्या जे.जे. मध्ये MBBS ला निवड!

चिखली (हॅलो बुलढाणा) जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाण असेल तर खेड्यागावातूनही थेट मुंबईच्या नामांकित कॉलेजपर्यंत झेप घेता येते, हे किन्ही सवडत येथील एका शेतकरी कुटुंबातील लेकीने दाखवून दिले आहे.

उंद्री (उदयनगर) पासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या किन्ही सवडत गावची रहिवासी कु. समीक्षा सहदेव धुरंदर हिने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET 2026* परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात563 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. 30 रोजी जाहीर झालेल्या निकालात तिची महाराष्ट्रातील टॉपचे आणि मानबिंदू असलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेज, जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे MBBS साठी निवड झाली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण उंद्री येथील सहकार विद्या मंदिरात*, तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे झाले. नवोदय विद्यालयाने तिच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. अकरावी-बारावीचे शिक्षण तिने *दक्षिणा फाउंडेशन, पुणे* येथे पूर्ण केले. 2026 मध्ये झालेल्या HSC परीक्षेत तिने *92 टक्के* गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि त्याच वर्षी घेतलेल्या NEET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून, ग्रामीण भागातून आणि *नवोदय सारख्या शासकीय विद्यालयातून* शिक्षण घेऊन मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या यशामुळे किन्ही सवडत, उंद्री, चिखली परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये आणि नवोदय परिवारात नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.

विद्यार्थिनी म्हणते..
‘माझे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांनी खूप कष्ट केले. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना, नवोदय विद्यालयातील माझ्या गुरुजनांना आणि दक्षिणा फाउंडेशनला देते. नवोदयने मला स्वप्न बघायला शिकवले.’

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!