किनगाव राजा (हॅलो बुलढाणा) “आम्ही पोलीस आहोत… पुढे तपासणी सुरू आहे. अंगावरील सोने काढून सुरक्षित ठेवा,” असे सांगत बनावट पोलीस ओळखपत्र दाखवून दोन भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याची तब्बल ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना किनगाव राजा-सिंदखेड राजा मार्गावर घडली. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील वडगाव पत्रा तांडा येथील धन्नू मानसिंग पवार (वय ६९) हे पत्नी अनुसयाबाई यांच्यासह २९ ऑगस्ट रोजी पांग्री उगले येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे दुचाकीने गावाकडे परत जात होते.
किनगाव राजा येथील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत आलेल्या हेल्मेटधारी दोघांनी त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवले. आपण पोलीस असल्याचे सांगत एकाने कथित ओळखपत्रही दाखवले. “चेकिंग सुरू आहे, अंगावरील दागिने घालून फिरू नका,” अशी बतावणी करून त्यांनी वृद्धाच्या हातातील साडेपाच ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील आठ ग्रॅमची एकदानी पोत काढायला लावली.
दागिने आणि मोबाइल रुमालात सुरक्षित बांधून देत असल्याचा बनाव करण्यात आला. त्याचवेळी मोबाइलवर फोन आल्याने वृद्धाने रुमाल उघडला; मात्र त्यामध्ये दागिने गायब असल्याचे पाहून त्यांना जबर धक्का बसला. तोपर्यंत दोन्ही भामटे दुचाकीवरून किनगाव राजाच्या दिशेने पसार झाले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने भामट्यांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाहीत. अखेर किनगाव राजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल नागरे करीत आहेत. नागरिकांनी अशा तोतया पोलिसांपासून सावध राहण्याची गरज आहे.











Total Users : 3369541