spot_img
spot_img

समृद्धीवर ‘हिट अँड रन’! पेट्रोल आणायला निघालेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले; श्रीराम कुटेंचा जागीच मृत्यू! शेतात फवारणी सुरू असतानाच पेट्रोल संपले; पंपाकडे जाताना चॅनल क्रमांक ३१० वर काळाचा घाला!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/ वसीम शेख) शेतातील फवारणीचे काम पूर्ण करण्यासाठी पेट्रोल आणायला निघालेल्या ६८ वर्षीय शेतकऱ्यावर समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला! रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८, रा. झोटिंगा, ता. सिंदखेडराजा) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता चॅनल क्रमांक ३१० वरील नागपूर कॉरिडॉरवर ही हृदयद्रावक घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम कुटे हे आपल्या शेतात फवारणी करीत होते. फवारणीसाठी लागणारे पेट्रोल संपल्यामुळे ते महामार्गालगतच्या पेट्रोल पंपाकडे निघाले. पंपावर जाण्यासाठी समृद्धी महामार्ग ओलांडत असतानाच सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र, माणुसकीला काळिमा फासत संबंधित वाहनचालक थांबण्याऐवजी वाहनासह पसार झाला.

घटनेची माहिती मृताचे पुत्र मारुती श्रीराम कुटे यांनी पोलिसांना दिली. बीबी पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, आकाश यादव, राहुल कायंदे तसेच मलकापूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

अपघातास कारणीभूत वाहन कोणते? महामार्गावरील सीसीटीव्हीत ते कैद झाले का? चालकाला बेड्या कधी ठोकणार? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणे आवश्यक आहे. या ‘हिट अँड रन’मुळे झोटिंगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!