जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) वनसंरक्षणासाठी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या वनरक्षकावर लाकडी चौपाटीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जामोद येथील सीतामाता मंदिर परिसरात घडली. या घटनेने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रात्रीच्या सुमारास वनरक्षक सादिक रमजान सुरतणे हे वनमजूर कुंजीलाल यांच्यासोबत शासकीय गणवेशात गस्तीवर होते. यावेळी रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती लाकडी चौपाटा घेऊन जाताना दिसल्याने वनरक्षक सादिक सुरतणे यांनी त्याला थांबवून लाकडाबाबत चौकशी केली तसेच नाव व गाव विचारले.मात्र, चौकशीचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने अरेरावी करत हातातील लाकडी चौपाटीने वनरक्षकाच्या खांद्यावर प्रहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर झटापट करत पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नव्हे तर ‘पुन्हा मला कोणत्याही कामासाठी अडवले तर जीवे मारेन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.घटनेनंतर चौकशी केली असता हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव शेख फारुख शेख गफूर, रा. सीतामाता परिसर, जामोद असल्याचे समोर आले.या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी FIR क्र. 0536/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 115(2), 352 आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल इरफान शेख पुढील तपास करीत आहेत.
वनरक्षकावरच हल्ला झाल्याने वनविभागात खळबळ उडाली. पोलिस तपासात आता पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.











Total Users : 3345668