डोंगर खंडाळा (हॅलो बुलढाणा) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत आता यमराजाची वाटत असून, या शिकस्त इमारतीतून ‘सरस्वती’ दर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता.आता प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून एक किमी अंतरावर विद्यार्थ्यांची व्यवस्था केली. परंतू विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडावा लागत असल्याने हे जीवघेणे ठरू शकते.त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
डोंगरखंडाळा येथील झेडपी शाळेची इमारत शिकस्त झाल्यामुळे विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री संभाजी राजे विद्यालयात करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करताना राज्य महामार्गाचा रस्ता ओलांडावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; शाळेची नवीन इमारत तातडीने उभारा,” अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून बांधकामाला सुरुवात करावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश शेषराव काकडे, उपाध्यक्षा कोमल दीपक भोंडे, सर्व शा. व्य. स. सदस्य,ज्ञानेश्वर सावळे,दिपक भोंडे, गजानन गायकवाड, शिवदास राठोड, राहुल राठोड तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.










Total Users : 3291722