मोताळा (हॅलो बुलढाणा) जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गेलेल्या मजुराला तोच रिकामा डब्बा डोक्यात मारून जखमी केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना मोताळा येथील समीर हॉटेलवर घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रत्नदीप नाना साबळे (वय २८, रा. सांगळद, ता. मोताळा) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ११ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ठेकेदार विशाल सरोदे यांनी त्यांना घरी जाऊन जेवणाचा डब्बा आणण्यास सांगितले. साबळे यांनी डब्बा आणून समीर हॉटेलवर दिला. तेथे विशाल सरोदे यांच्यासोबत शेख नासीर शेख साबीर हा बसलेला होता.
विशाल सरोदे कामाच्या ठिकाणी निघून गेल्यानंतर शेख नासीरने डब्ब्यातील जेवण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जेवणानंतर साबळे यांनी डब्बा घरी पोहोचविण्यास सांगितले. त्यावर आरोपीने दुचाकीची चावी मागितली. चावी देण्यास नकार मिळताच संतापलेल्या आरोपीने हातातील रिकामा डब्बा साबळे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात साबळे यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. हॉटेल मालक संदेश पाटील यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. जखमीवर मोताळा येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक आडोकार करीत आहेत.










