धाड (हॅलो बुलढाणा) धाड शहरातील बेशिस्त वाहतूक, रस्त्यांवरील मनमानी पार्किंग आणि अवैध धंद्यांना आता चाप बसणार आहे. धाड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
२९ जून रोजी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवार, ९ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिचय बैठकीत मोरे यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. बसस्थानक परिसर आणि करडी रोडवरील रोजच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रथम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“सुरुवातीला वाहनधारकांना नियम समजावून सांगू; मात्र वारंवार सूचना देऊनही नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला. रस्त्यांवर वाहने उभी करून पादचारी आणि नागरिकांची अडवणूक करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनी अवैध रेती वाहतूक, विनाक्रमांक भरधाव टिप्पर, वरली-मटका आणि अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. यावर मोरे यांनी त्वरित धडक कारवाईचे आश्वासन दिले. पोलीस आणि पत्रकार हे जनतेतील महत्त्वाचे दुवे असून, धाड शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.










