देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) टाकरखेड भागिले येथील २७ वर्षीय ऋषिकेश गजानन भागिले यांच्या मृत्यूला १४ दिवस उलटूनही धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध लागलेला नसल्याने पोलीस तपासाच्या गतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
२७ जून २०२६ रोजी रात्री असोला फाट्यावरील शहीद वीर जवान पेट्रोल पंपासमोर ऋषिकेश यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश यांचा मृत्यू झाला. रावसाहेब डोके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला; मात्र तपासात समाधानकारक प्रगती नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, पेट्रोल पंप परिसरातील वाहतूक नोंदी, प्रत्यक्षदर्शी आणि संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. ऋषिकेश हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते आणि अवघ्या दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दोषी वाहनचालकाला तातडीने बेड्या ठोकून भागिले कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.










