जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रात प्रतिबंध असतानाही सुगंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा काळाबाजार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. जळगाव जामोद पोलिसांनी निमखेडी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर धडक कारवाई करत टाटा इंट्रा गोल्ड वाहनातून तब्बल २२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र कारवाईची चाहूल लागताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने या गुटखा तस्करीमागील मोठी साखळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार, १० जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निमखेडी तपासणी नाक्यावर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. संशयित टाटा इंट्रा गोल्ड वाहनाची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
कारवाईत सुमारे १० लाख ३९ हजार ५०० रुपयांचा पानमसाला, ६ लाख ९३ हजार रुपयांची सुगंधित च्युईंग तंबाखू, पाच हजार रुपयांचा विवो मोबाइल आणि पाच लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा प्रतिबंधित माल विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहून नेला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार चालकाचा शोध सुरू असून, हा लाखोंचा गुटखा नेमका कुठून आला आणि बुलढाणा जिल्ह्यात कुठे पोहोचणार होता? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.










