जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे काळवीटाच्या शिकारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस शिजवत असतानाच वनविभागाने आरोपींच्या घरावर धाड टाकली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद वनविभागाने या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी वनविभागाला तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथे काळवीटाची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वनपाल पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. पथकाने कारवाई केली असता आरोपी शंकर दामा मुंढे, शिवहरी दामा मुंढे आणि देविदास दामा मुंढे यांच्या घरी काळवीटाचे मांस शिजवत असल्याचे आढळून आले.
या घटनेनंतर वनविभागाने संबंधित आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत वनगुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे आणि वनपाल पाथ्रीकर करीत आहेत.
ही धडक कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनरक्षक निकाळजे, जाधव, धवसे तसेच वाहनचालक गजानन कुटे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, काळवीट हा संरक्षित वन्यप्राणी असून त्याची शिकार करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दोषी आढळल्यास कमाल सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. नागरिकांनी कुठेही वन्यप्राण्यांची शिकार किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.










